Planting of Black Money | काळ्या पैशाची लागवड
ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा. भ्रष्टाचाराचं लाडकं लेकरू. पण या भ्रष्टाचाराचा बाप कोण ? याला जन्म कोणी दिला ? आपण तर नाही ना याला कारणीभूत ?
विद्यमान सरकारने मागच्या वर्षी नोटबंदीसारखे पाउल उचलले आणि त्यानंतर सगळीकडे चर्चा सुरू झाली ती म्हणजे काळा पैसा किंवा ब्लॅकमनीची. काळापैसा आणि त्याचे उद्गाते जगासमोर उघडकीस यावे यासाठी सरकारने नोटाबंदीचा उपक्रम राबविला. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार वाढीस लागतो. यासाठी काळ्या पैशाला आळा घालणे फार महत्वाचे आहे.
काळा पैसा म्हणजे बे-हिशोबी मालमत्ता. अशी रक्कम, जी कशी आली आणि कुठून आली, याबद्दल कोणाकडेही ठोस पुरावे नाहीत. काळ्या पैशाची निर्मिती कोणी केली, त्याला कारणीभूत कोण, यावरून बर्याचजणांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. सामान्य माणसाच्या मते, श्रीमंत उद्योगपती, राजकारणी लोक हे यासाठी जबाबदार आहेत. असतीलही; परंतु यासाठी कोणीही कळत-नकळतपणे जबाबदार असू शकतो. सर्वसामान्य भोळभाबडा गरीब सुद्धा.हे पटवून देण्यासाठी इथे एक कथा सांगत आहे. ही कथा आहे एका सुशिक्षित म्हणजे (वेल-एजुकेटेड) तरुणाची. त्याचा नीटनेटका पोषाख त्याच्या सुशिक्षित असल्याचा दाखला देत होता. हा युवक एकदा बसने प्रवास करायला निघाला. एस.टी.चा प्रवास. बसमध्ये प्रवेश करताच त्याने आपले आसन म्हणजे सीट पकडली. वाहक आणि चालक येताच बस गतिमान झाली. वाहकाने नेहमीप्रमाणे तीकिट फाडण्यास सुरुवात केली. इतर प्रवाशांना तीकिट देवुन, वाहक ह्या तरुणापर्यंत येउन पोचला. तरुणाचा प्रवास काही फार लांबचा नव्हता. अगदी बारा रूपयांचा प्रवास होता तो. तरुणाने त्याला, ज्या स्टॉपवर उतरावयचे आहे त्या स्टॉपचे नाव सांगितले. तीकिटाचे पैसे किती, हे विचारताना त्याने दहा रु.ची नोट वाहकाला देऊ केली. वाहकाने बारा रु. सांगताच, तरुणाने दोन रु.चे नाणे शोधण्यासाठी खिशात हात घातला. एवढ्यात वाहक बोलला, "असू द्या" आणि तरुणास दोन रु.ची दोन नाणी देऊ केली. तरुण गोंधळला. तो विचार करू लागला कि, वाहकाने त्याच्याकडून दोन रु. घेण्याऐवजी दोन रु.ची दोन नाणी का दिली ? प्रवास भाडे बारा रु. असताना फक्त सहाच रु. का घेतले ? तरुण विचार करेस्तोवर वाहक पुढच्या प्रवाशाकडे वळला. तरुणाने वाहकाच्या नजरेला प्रश्नार्थक नजर भिडवली ; पण वाहकाने उत्तर म्हणून एक स्मितहास्य देत हिशोब चुकला नसल्याची खात्री दिली.
काही अंतर पार पडताच तरुणाच्या लक्षात आले कि वाहकाने त्याला तीकिट दिलेच नाही. आता मात्र तरुणाने वाहकाचा डाव ओळखला होता. वाहकने बारा रु.चा प्रवास अवघ्या सहा रु.त करू दिला . यामुळे तरुणाचा सहा रु.चा फायदा झाला. वाहकाने तीकिट फाडले नसल्याने त्याचाही सहा रु.चा फायदा झाला. बस सेवेचे मात्र यात बारा रु.चे नुकसान झाले. वाहक आणि तरुण दोघांच्याही खिशात प्रत्येकी सहा रु.ची बे-हिशोबी रक्कम काळ्या पैशाच्या स्वरुपात जमा झाली होती. तरुण सुशिक्षित होता, निदान थोडीफार तरी नीतिमत्ता जाणत असेल. तो हे सर्व रोखू शकला असता, पण त्याने तसे न करता सहा रु.च्या क्षुल्लक फायद्यासाठी काळ्या पैशाच्या निर्मितीत हातभारच लावला. या दोघांनी स्वतःचा स्वार्थ साधला; परंतु त्या दोघांनाही याचे काडीमात्रही भान नव्हते कि त्यांच्या ह्या कृत्यामुळे त्यांनी भविष्यातील 'नोटाबंदी'ला आमंत्रण दिले होते.नोटाबंदीचे परिणाम खूपच भयंकर झाले. ए.टी.एम.च्या रांगेत कितीतरी निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. सामान्य गरीब माणसालाच याचा खूप त्रास सहन करावा लागला. तपास केला तर अशा कितीतरी कथा मिळतील कि ज्यामुळे काळ्या-पैशाचा हा भस्मासुर दिवसेंदिवस मोठा होत आहे. काळ्या पैशाची ही अशाप्रकारची लागवड आपण खालच्या पातळीवरच रोखली पाहिजे; जेणेकरून एका पैशाचा सुद्धा हिशोब मिळेल.चला तर मग, संकल्प करूया ! प्रामाणिक, निस्वार्थी आणि पुर्णपणे पारदर्शक अशी व्यवहार पद्धती वापरूया आणि काळ्या पैशाचे साम्राज्य समाजातील सर्वच स्तरांवरून नेस्तनाबुत करूया.
✍️सचिन काळोजी🙏



.jpeg)
Comments
Post a Comment