It's A Sleep... | निद्रा तिचं नाव...


     दिवसभर कामं करून माणूस जेव्हा थकतो, तेव्हा त्याला गरज असते ती विश्रांतीची. शरीराला खरी विश्रांती मिळते ती रात्रीच्या झोपेमुळे. मनुष्यप्राण्याला अजूनही या झोपेची किंमत कळालेली नाही, त्याने तर या झोपेवरही अतिक्रमण केलं आहे.
एकदा पहाटेपहाटे साखर झोपेतून जागं झाल्यावर, मला अंथरुणातच सुचलेले हे चार शब्द....


तिच्या येण्याने, मला मिळतो आराम,
थांबवतो मी माझ्या, हातातलं काम.

ती आली की माझी, मज्जा मात्र असते,
भेटावया स्वप्नी, सुंदर परी येते.

कधी कधी ती असते, भेटावया अधीर,
मला मात्र होतो, कामांमुळे उशीर.

ती आल्यावर पडतो मी, अंथरुणात निपचित,
दिनचर्येचे माझ्या, तीच करते ऑडिट.

कधी तिला यायला, होतो खूप उशीर,
देतो मग कसाबसा, स्वतःलाच धीर.

मधेच कधी कधी, तीही रुसून बसते,
कितीही मनवलं तरी, खूपच भाव खाते.

पण जेव्हा ती येते, मिठीत मला घेते,
मनापासून मला, खूप शांत वाटते.

उजाडल्यावर मात्र, जाते ती निघून,
कानात माझ्या, शुभप्रभात सांगून.

तसं कधीकधी, इकडेतिकडे बघून,
न्याहारी नंतर आम्ही, भेटतो चोरूनचोरून.

दमलेला मला पाहून, मांडते आपला डाव,
सर्वांची ती लाडकी, निद्रा तिचं नाव......

- सचिन काळोजी.

Comments

Post a Comment