तुच आहेस ना तो ?

     आयुष्य जगत असताना, आपल्याला कितीतरी बऱ्यावाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. आपल्याला वाटतं की आपण या प्रसंगांमध्ये एकटे पडलोय. मात्र; कुणीतरी असतो, जो प्रत्येक क्षणाला आपली साथ देतो, आपल्याला मार्ग दाखवतो, आपली मदत करतो. नक्की कोण असतो तो?
खरं खरं सांग....तुच आहेस ना तो ?


कधी होउन वारा, मंद वाहणारा,
झाडाझाडांच्या कुशीत, दुडूदुडू धावणारा.

नवजात बालकाच्या, नाजूक डोळ्यांतून,
गोड हसून नव्याने, जगास न्याहाळणारा.

कधी आई वडील होऊन,
संगोपन करणारा.

तर कधि वंशाचा दिवा होऊन,
आई वडिलांना सांभाळणारा.

कधी होतो बहीण, समजाऊन सांगणारी,
कधी होतो भाऊ, बहिणीला रक्षणारा.

शिक्षक होऊन ज्ञानी बनवून,
जगण्याचा मार्ग दाखविणारा.

वैद्य आणि परिचारिका बनुन,
जीविताच रक्षण करणारा.

पोलिस, वकील होऊन जगी,
न्यायव्यवस्था सांभाळणारा.

कधि होऊन अनोळखी वाटसरू,
प्रवासात सोबत करणारा.

भाऊ, मित्र, सहकारी,
सगळ्याच भूमिका साकारणारा.

कधी होऊन अन्नाचा दाणा,
पोटाची खळगी भागवणारा.

तर कधी होऊन वस्त्र,
लज्जा रक्षण करणारा.

कधी राबतो शेतात, प्रखर ऊनात,
धरणीमातेच्या गर्भातून, पीक उगवणारा.

कणाकणांत असूनही,
मुर्त्यांमधेच शोधला जाणारा.

रूपे तुझी किती वर्णू,
शब्दांनाही तू उणे पाडणारा.

नावं तुझी अनेक, रुपेही अनेक,
चराचर व्यापुनी, उरलासी तू एक.

सर्वांना तू सांभाळ, आणि सुखी ठेव,
जगामाजी सगळे, म्हणती तुला "देव"..........

- सचिन काळोजी.

Comments

Post a Comment