देव कुणी पाहिलाय का?


     देव देव करणारे आपण, खरंच देवाला ओळखतो का?
काही लोक देव मानत नाहीत, मानणारे त्याला नीट जाणत नाहीत. निराकार आणि निर्गुण ईश्वर आपण कधी शोधलाय का?

देव कुणी पाहिलाय का?
कोणी सांगतील हो, काही म्हणतील नाही.
देव नाहीच असं मानणारे, असतीलही काही.

पाहिला तर सांगाल का? तो दिसतो तरी कसा?
की दिसला तुम्हाला, तुम्ही पाहिला तसा?

पण तो कसा दिसणार? तो तर आहे निराकार.
नाही कळला कोणाला, अजूनहि त्याचा प्रकार.

मुळात देव ही, गोष्ट आहे का बघण्याची?
की आहे जागृती, मनातून अनुभवण्याची?

दर्शनरांगा, पुजा साहित्याची मांडिलित दुकाने,
ही तर त्याच्या भेटीची, आहेत फक्त साधने.

घ्या दर्शन मुर्त्यांचे, असती हे दरवाजे,
त्याही पलीकडे सूक्ष्म रुपात, बसले देवराजे.

प्रसन्न होती आमुची मने, ऐकोनी कीर्तन भजन,
हीच भावना असे खरी, त्याचा आमुचा संगम.

देवा प्रसन्न करण्याआधी, घ्या त्यासी जाणुन,
न पेक्षा एक व्हा त्याच्याशी, स्वतः प्रसन्न होऊन.

इथे तिथे शोधु नका, डोकवा जरा आत,
बाहेर नको, राहतो तो तुमच्याच हृदयात.

मग पहा अवतीभवती, दिसेल तो चराचरात,
अंतरीच्या जाणिवेनेच मात्र, शोधाया करा सुरुवात.

श्रद्धेनेच जाणावा, सदैव त्याचा वास,
नका करू अंत त्याचा, ठेवुनी अविश्वास.

ध्यानी मनी सदा असावे, याच ज्ञानाचे भान,
नाम मग काहीही घ्या, कुणी कृष्ण कुणी राम.
कुणी कृष्ण .......... कुणी राम..........

- सचिन काळोजी.



Comments

Post a Comment