कटुसत्य


कटुसत्य

      पोटापाण्यासाठी गावाकडचे लोक शहराकडे वळले. तिथेच स्थिरावले. अधूनमधून गावाकडच्या आठवणी हजेरी लावत असतात पण पोट आहे तर सगळं आहे. पण तरीही गाव तो गाव. सुट्टी मिळाली की चाकरमानी निघाले गावाला. आता पूर्वीसारखं बसची गर्दी झेलावी लागत नाही, कारण आता बऱ्याच लोकांकडे स्वतःच्या चारचाकी गाड्या आहेत. शहरातून थेट गावी घरच्या अंगणात. पण हल्ली एक नवीनच अडचण त्यांना भासू लागली. आमची गाडी नवीन आहे, गावाकडच्या या अशा रस्त्यांवर चालवली तर गाडीची वाट लागेल म्हणे. तसं पाहता त्यांचीही चूक नाहीच म्हणा. आपले रस्तेच असे आहेत की कोणीही विचार केल्याशिवाय पाय ठेवणार नाही. ग्रामीण भागात भेट देऊन परतताना पर्यटक खुपच खुष दिसतात पण एक छोटीशी तक्रार असतेच, ती म्हणजे रस्त्यांची. पर्यटनाचे वारे भलेही गावोगावी धडकले आहेत, पण या वाऱ्यांमधे कुठेही डांबर, खडी, वाळू असल्याचं दिसत नाही.
      बरं ही काही अशक्यप्राय गोष्ट आहे असंही नाही. निवडणुकांपूर्वी हेच रस्ते सरकारी गणवेष घालून मिरवत असतात. सफेद रंगाची किनार असलेला राखाडी रंगाचा चमकदार गणवेष घातलेले हे रस्ते कुणालाही प्रेमात पाडतील असेच असतात. नव्याची नवलाई म्हणावं तसं हा गणवेषही लाल दिव्याच्या गाड्यांचा ताफा येऊन जाईपर्यंतच.
      प्रचार आटोपला की लगेच निवडणुका होतात. निवडणुका झाल्या की खातेवाटपाचा कार्यक्रम सुरू होतो. हा हा म्हणता, पावसाळा हजेरी लावतो. एकदा का पाऊस सुरू झाला की रस्त्याच्या गणवेषाचा रंग निघून जायला सुरुवात होते. गणवेषाची खरी प्रत कळते ती यावेळी. मुसळधार पावसाचे थेंब आणि गारा रस्त्यावर असा काही धिंगाणा घालतात जसं काही रस्त्याच्या वरातीलाच आले आहेत. अजून एक दोन आठवडे निघून गेले की गणवेषाला पडलेली भोकं दिसू लागतात. 'खड्डयात गेले रस्ते' की 'रस्त्यात गेले खड्डे', असा भ्रम निर्माण होतो. सूर्यमालेतील सर्व ग्रहांचे दर्शन या खड्डयांमध्ये होते. आश्चर्य म्हणजे या सर्वच्या सर्वच ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट होते. जगातील किती टक्के पाणी सागरात आहे माहित नाही, पण जमिनीवरील जास्तीत जास्त पाणी ह्या खड्डयांमधेच आढळते.


 
      अशा या ओबडधोबड रस्त्यांवर, लटकत मुरडत नाचायला वाहनांना खूप मजा येत असेल पण हीच मजा वाहकांसाठी सजा बनते. खड्डे आणि वाहनांच्या प्रीतिसंगमातून जन्माला येतात मणक्यांचे असंख्य आजार. खड्डयांकडुन कोणतीही पोटगी मिळत नसल्याने हे आजार बिचाऱ्या वाहकांनाच पोसावे लागतात. या खड्डयांमुळे कित्येकदा जीवघेणे अपघातही झालेले आढळतात.

      आपले ग्रामीण रस्ते पक्के आणि सुशोभित असावे, दीर्घकाळ टिकणारे असावेत यासाठी सरकारकडे कोणतीच योजना नाही का ? मानलं की ग्रामीण भाग सृष्टी सौंदर्याने नटलेला आहे, म्हणूनच तर इथे पर्यटनाच्या विकासाला चालना मिळतेय. पण त्यासाठी इथे पोचवणारे रस्तेसुद्धा तितकेच पक्के असायला हवेत. रस्त्यावरून होणारी जड वाहतूक विचारात घेऊनच रस्त्याच्या थराची उंची आणि त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची प्रत ठरवावी. सरकारला एक विनंती आहे, पर्यटन, विकास सगळं काही करा पण त्याआधी एकदा रस्त्यांच्या या अवस्थेकडे नक्कीच लक्ष द्या !

✍️सचिन काळोजी🙏



Comments