A Step Towards Change | एक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने...

      समाजात बऱ्याचदा विकृत घटना घडत असतात. समाजाचा  पाया हा संस्कारांनी रचलेला असल्याने, सर्व खापर संस्कार करणाऱ्यांवर फोडलं जातं. यात अग्रस्थान मिळतं ते दूरदर्शनवरील चित्रपट आणि मालिकांना. पण याचा खरेखोटेपणा कधी पडताळला गेलाय का?  कुसंस्कारांसाठी प्रसारमाध्यमांवर थेट आरोप करणं योग्य आहे का? कारण शेवटी रीमोट तर आपल्याच हातात असतो. रीमोट फक्त टीव्हीचाच नव्हे, तर रीमोट स्व-भावनांच्या नियंत्रणाचासुद्धा.

    " सदर मालिका काल्पनिक घटनांवर आधारित आहे आणि त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा. "



   दूरदर्शनवरील एखादा सिनेमा किंवा मालिका, मग ती कोणत्याही भाषेतली असो अगर कोणत्याही शहरात प्रदर्शित होणारी असो, त्याच्या सुरुवातीस ही वाक्ये तुम्ही बऱ्याचदा पाहिली असतील. कथेतील एखाद्या भागावरून किंवा भुमिकेवरून कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि कथेवर कोणी आक्षेप घेऊ नये, यासाठी हे वाक्य सुरुवातीलाच दाखवले जाते.

   पण एखादा निर्माता किंवा लेखक जेव्हा एखादा लेख लिहितो, तेव्हा जरी तो लेख काल्पनिक असला तरी त्या मागची प्रेरणा ही वास्तवातुनच जन्मलेली असते. लेखकाने आपल्या कल्पक आणि रंजक बुध्दिमत्तेने त्याची विशेष मांडणी केलेली असते. वास्तवातील घटनेचा शेवट आणि परिणाम जरी कटू आणि भयंकर असला तरी कथेतला शेवट हा गोड, अर्थपूर्ण, बोध घेण्याजोगा आणि समाधानकारक असाच असतो. वास्तवात घडलेल्या सामाजिक, कौटुंबिक अगर कोणत्याही घटनेकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून बघितले जावे, त्यातून योग्य तो बोध घेतला जावा आणि त्यावर सकारात्मक तसेच समाजहिताचा उपाय योजला जावा, हाच निव्वळ आणि प्रामाणिक उद्देश बाळगुन लेखकाने त्या कथेस जन्म दिलेला असतो.

   वाचक किंवा प्रेक्षक, लेख किंवा मालिका पाहताना, त्याचा मुख्य आशय लक्षात घेत नाहीत. त्याकडे साधकबाधक दृष्टीने बघत नाहीत. त्यातील घटनांचा संबंध स्वतःच्या जीवनाशी जुळवुन घेतात. कथेच्या नायकामधे किंवा पीडित अत्याचारित  भुमिकेमधे स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतात. कथेतील पात्राने घेतलेले निर्णय हे कथेतील घटनेला अनुसरून असतात, तसेच ते त्या लेखकाचे विचार असतात, हे सुद्धा तितकेच खरे आहे. प्रेक्षक आणि वाचक मात्र, कथेतील निर्णय जसेच्या तसे वास्तवात अवलंबण्याचा प्रयत्न करतात.

    सूड, प्रेम, निराशा, अत्याचार, धोका, आपुलकी, फसविणे आणि फसविले जाणे, या आणि अशा बऱ्याच गोष्टींच्या व्याख्या, ह्या मालिका पाहुन बनवतात. आणि त्यातून जे उत्पन्न होते ते बऱ्याचदा नको तेच असते. आता यात चूक कोणाची ? लेखकाची की वाचक - प्रेक्षक यांच्या दृष्टिकोनाची ? 

    कथा कशीही असली तरी त्यातून आपण नेमके काय घ्यायचे आहे ,हे आपल्या स्वतःच्या हातात असते. शिवाय कोणती मालिका पहावी आणि कोणती नको, याबाबतही व्यक्तिस्वातंत्र्य आहेच. सेन्सॉर बोर्ड कडूनही योग्य त्या प्रमाणात छाटणी केली जाते. समाजाकडून मात्र, आक्षेप घेतला जातो तो चित्रपट आणि मालिकांवर, कथेच्या लेखकावर. आज कुठेतरी हे सर्व बदललं पाहिजे. समाजामध्ये याविषयी प्रबोधनाची दाट आवश्यकता निर्माण झालेली आहे. 

    आज लहान मुलांवर होणारे संस्कार हे पालक आणि शिक्षक यांपेक्षा चित्रपट आणि मालिकांमधून जास्त होत असतात, हे जरी वरकरणी सत्य असले तरी, लेखक आणि मालिकांना यासाठी सर्वस्वी जबाबदार ठरवणे, चुकीचे ठरेल.  लहान मुलांमध्ये चांगले आणि वाईट यांतला फरक जाणण्याची कुवत कमी असते. जे समोर दाखविले जाते तेच सत्य आहे आणि आपल्याच अनुषंगाने आहे, असे मानतात. हीच लहान मुले, उद्याची तरुणपिढी म्हणून उदयास येणार आहेत. आजची मोठी माणसे ही तीच लहान मुले आहेत, जी आज वयाने मोठी झाली आहेत.    

   तर आता जागं होण्याची वेळ आलेली आहे. या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन, विचार आणि संस्कारांनी मजबूत असा समाज घडवणं, आता अनिवार्य झालं आहे. हा लेख वाचून, तुम्ही इतरांसाठी जरी काही करू शकत नसालात, तरी स्वतःच्या विचारसरणीत  नक्कीच बदल करा. वैयक्तिक पातळीवर जरी विचार परिवर्तन घडले तरी पुष्कळ आहे. स्वतःमध्ये बदल, हीच समाज प्रबोधनाची पहिली पायरी आहे.

   कृपया, यावर नक्कीच विचार करा !

इथे क्लिक करा आणि वाचा "मेरी तनहाईयाॅं"


इथे वाचा_स्वातंत्र्याला मानाचा मुजरा

Comments

Post a Comment