भय इथले अजुनि संपले नाही | The fear is not over here yet
मनी तिच्या एकदा इच्छा निर्माण झाली
अवतराया मानवी देहात, आतुर ती झाली
निवडली तिने एका गर्भामधे जागा
लुटाया नऊ मासांची विलक्षण मजा
गुदमरली ती क्षणोक्षणी कासावीस झाली
घाबऱ्या पावलांनीच ती जन्माला आली
दर्शनाने तिच्या, घरची नाकं मुरडली
का तर म्हणे ती कन्या म्हणून जन्मली
चार मासांचीच असताना घडलं काहीतरी
केली होती कुणीतरी अपहरणाची तयारी
नशिबानेच वाचली होती पोर बिचारी
भीती मात्र आता पक्की झाली उदरी
हळू हळू मोठी झाली, तारुण्याने बहरली
वासनेची नजर तिच्या, सर्वांगावर फिरू लागली
दुर्लक्ष करत तिने स्वतःचीच समजूत घातली
याचाच फायदा घेत गर्दीने अब्रू तिची दाबली
शिकली ती सवरली, स्वतःच्या पायावर उभी राहिली
तरीही वासनेने तिची पाठ नाही सोडली
हर तऱ्हेच्या पेहरावाने साथ तिला दिली
अज्ञाताने तरीही छेड तिची काढली
कंटाळली ती खेड्याला, शहरात रहायला आली
इथे तर अक्षरशः जीव द्यायची वेळ आली
अन् एके दिवशी विकृतीचा उद्रेक तो झाला
काही समजायच्या आधीच, बलात्कार झाला
मीडियाने ही आपली भूमिका बजावली
नेत्यांनीही प्रचाराची रॅली उरकून घेतली
न्यायाच्या नावाखाली अजुनच बदनाम झाली
तिच्यासाठीचा न्याय कोणाला कळलाच नाही
पोलिसांनी मात्र आपले प्राण पणाला लावले
चार दिवसात नराधमाला फासावर लटकवले
"काळजी घे" सांगून, निघून सगळे गेले
मनावरचे घाव तिच्या, तसेच राहिले ओले
औषध पाण्याने शरीरावरचे घाव भरून आले
मनावरचे मात्र तिच्या तसेच दडून राहिले
केले तिने यत्न सगळं विसरण्यासाठी
ओळख मात्र तिला पीडित म्हणूनच मिळाली
उठता बसता मिळाली तिला फक्त सांत्वना
सांत्वनेनेच होत होती पुन्हा जागी यातना
अखेर केला तिने जीवनाचा शेवट
आत्म्यावरही राहिले भीतीचे सावट
जन्म घेण्या आता मन धजावत नाही
कारण भय इथले अजुनि संपले नाही.
✍️सचिन काळोजी.
वाचा : मुंबई मेरी जान




.jpeg)
🙏
ReplyDeleteछान सचिन.. 👍👍
ReplyDeleteधन्यवाद ! 🙏🙏🙏
Delete