The Call of the Mute Trees | मुक्या झाडांची आर्त हाक
मुक्या झाडांची आर्त हाक
काल दुपारी घरात खूप उष्मा जाणवत होता. वीज पुरवठा कोणी खंडित केलेला माहित नाही, पण त्यामुळे आमच्या घरचा पंखा उगाचच माझ्यावर रुसून बसला होता. मग मीच बाहेर अंगणात आलो. अंगणातल्या झाडाखाली आरामखुर्चीवर विराजमान झालो. एरव्ही इकडेतिकडे मस्ती करणाऱ्या वाऱ्याला आज कोणी कीडनॅप केला होता कुणास ठाऊक ? अंगावरून वाहणाऱ्या घामाच्या धारा गुदगुल्या करत चिडवत होत्याच. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यावाचून माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय उपलब्ध नव्हता.
भर उनातही हे सगळेजण मिळून आनंदोत्सव साजरा करत होते. वाऱ्याची एक छोटीशी मंद झुळूक त्यांच्यासाठी खूप काही घेऊन आली होती. यांच्या विचारात मी कधी भान हरपून गेलो होतो माझं मलाच कळत नव्हतं. ही मंद वाहणारी झुळूक, ती सळसळ करणारी पाने, खारुताईचं मंजुळ संगीत, सगळेच मला सुखावत होते.
मित्रांनो, निसर्ग हा आपला एक खूपच जवळचा मित्र आहे आणि निसर्गाचं प्रतिनिधित्व प्रामुख्याने कोण करत असेल तर ही हिरवीगार झाडे. मनाला सुखावणारी ही झाडे आपल्या पदरात बरच काही दान करत असतात. दूषित हवा शुद्ध करून वातावरणात गारवा आणतात, सगळ्यांसाठी प्राणवायू देतात. पावसाची हमी देतात. अजून बरच काही देतात,जे आपणा सर्वांनाच माहीत आहे. एवढं असूनही वृक्षतोड करताना मात्र आपण इतके निर्दयी आणि क्रूर का होतो? त्यांच्या खून करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?
झाडं मुकी आहेत, ती "वाचवा वाचवा" असं ओरडू शकत नाहीत. त्यांना कोणताही राजकीय पक्ष ती 'वाय' का कसली ती सुरक्षा पुरवतही नाही. झाडं आपली गाऱ्हाणी घेऊन राज्यपालांकडे जाऊ शकत नाहीत. ती रडू शकतात पण आपण त्यांचे अश्रू पाहू शकत नाहीत. पण त्यांना वाचवण्याची नैतिक जबाबदारी आपली नव्हे का ? आज जगभरात वृक्ष संवर्धन आणि तत्सम कार्यक्रम राबविले जातात, त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची गरज आहे. वृक्षतोडीविरुद्ध बरेच कायदे आहेत, पण त्याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. झाडांचं महत्त्व आणि झाडांपासून मिळणारी निरनिराळी वरदाने यांची जाणीव खेड्यापाड्यातील जनतेला करून देणं गरजेचं आहे. आजही खेडोपाडी जुनी, अशिक्षित वयस्कर मंडळी आहे जी झाडांची महती जाणतात. आणि नागरीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड करणारा आपला हा आजचा सुशिक्षित वर्गच पुढे असतो. काही प्रसंगी एखादं झाड तोडणं हा नाईलाज असतो, पण तसं करण्यापूर्वी ते टाळता येण्याच्या सर्व शक्यता आपण अभासल्या पाहिजेत. एक झाड तोडण्यापुर्वी, त्या बदल्यात दहा आणखी झाडं लावून त्यांची मोठी होईपर्यंत जोपासना केली पाहिजे.



.jpeg)
Comments
Post a Comment